जळगाव (प्रतिनिधी) पती अंत्यविधीसाठी गेलेले होते तर मोठी मुलगी खालच्या मजल्यावर खेळत होती. यावेळी घरात कोणीही नसतांना सोनाली दीपक दाभाडे (वय ३६, रा. हरिविठ्ठलनगर) यांनी आपल्या पोटच्या गोळा असलेल्या तेजस्वीनी दीपक दाभाडे (वय ७) या चिमुकलीला गळफास दिला. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. ही अत्यंत दुर्देवी घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरातील व्यंकटेश नगरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहरातील हरविठ्ठल नगरात दीपक दाभाडे यांच्यासह दोघ भावंडांचे एकत्रीत कुटुंब वास्तव्यास आहे. शहरात त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून ते तिघे भावंडांचा त्यावर उदनिर्वाह सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास भुसावळ येथील त्यांचे नातेवाईकांचे निधन झाल्यामुळे रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दीपक हे आपल्या दोघ भावंडांसह वहिनींना घेवून भुसावळ येथे अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर ते पावणेबारा वाजेच्या सुमारास घरी पोहचले. घरी आल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दीपक दाभाडे यांनी बेल वाजवली, परंतु आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजाची आतून लावलेली कडी धक्का मारुन उघडली. घराचा दरवाजा उघडताच दीपक दाभाडे यांना त्यांच्या पत्नी सोनालीसह मुलगी तेजस्विनी या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांनी दोन वेगवेगळ्या दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी मनहेलावणारा आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, प्रवीण जगदाळे यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. विवाहिता सोनाली दाभाडे यांचे माहेर मालेगाव येथील आहे. घटनेनंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या आई, वडीलांसह माहेरच्या मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मुलीसह नातीचा मृतदेह बघताच एकच आक्रोश केला. त्यांनी केलेल्या आक्रोशामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दाभाडे यांच्या नातेवाईक, मित्रांसह परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.