जळगाव (प्रतिनिधी) अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडून विवाहिता गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दूध फेडरेशनजवळील समृद्धी अपार्टमेंट परिसरात घडली. नसरीन वसीम पिंजारी (वय २८, रा. समृद्धी अपार्टमेंट), असे विवाहितेचे नाव असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, सासरच्यांकडून विवाहितेसोबत घातपात केल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे.
नंदूरबाद जिल्ह्यातील रणाळे येथील माहेर असलेल्या नसरीन पिंजारी यांचा विवाहिता शहरातील सत्यम पार्क परिसरातील समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वसीम पिंजारी यांच्यासोबत झाला आहे. त्या सासू, सासरे, दीर, दिराणी यांच्यासह याठिकाणी वास्तव्यास आहे. त्याच अपार्टमेंटखाली त्यांचे पतीचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. शुक्रवारी रात्री नसरीन यांचे त्यांच्या सासरच्यांसोबत वाद झाला. त्यानंतर त्यांनी वडीलांना फोन लावून त्याबाबत देखील सांगितले. यावेळी त्यांच्या माहेरच्यांनी आम्ही सकाळी तुला घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी नसरीन पिंजारी यांचे वडील व भाऊ त्यांना घेवून जाण्यासाठी नंदूरबाद येथून जळगावला यायला निघाले.
जळगावला येण्यासाठी निघालेल्या विवाहितेचा भाऊ अफजल पिंजारी याने बहिणीला फोन लावून आम्ही येत असल्याचे सांगितले. यावेळी तिच्या सासरच्यांनी नसरीन भांडे घसतांना घरात पडली असे सांगत फोन कट केला. त्यानंतर अफजल याने पुन्हा फोन लावून आम्हाला तिच्यासोबत बोलायचे आहे असे म्हटला असता, त्यांनी नसरीन या चौथ्या मजल्यावरुन खाली पडली असून तीला दवाखान्यात नेले असल्याचे त्यांनी सांगितले.
सासरच्यांनी फेकून दिल्याचा आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री देखील त्यांच्यात वाद झाला. याच वादातून सासरच्यांनी विवाहितेचा चौथ्या मजल्यावरुन फेकून देत घातपात केल्याचा आरोप विवाहितेचे वडील आणि भाऊ अफजल पिंजारी यांनी केला आहे.