जामनेर (प्रतिनिधी) रात्रपाळीची ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या रिक्षाचा आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षातील रविंद्र आनंदा बावस्कर (वय ३०, रा. टाकळी, ता. जामनेर) या तरुणाचा मृत्यू झाला. तर रिक्षासह कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना टाकळी रोडवरील हॉटेल आर्यन गार्डन समोर रात्रीच्या सुमारास घडली.
जामनेर तालुक्यातील टाकळी येथे रविंद्र बावस्कर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो गाडेगाव येथील सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीत नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावित होता. दि.१८ रोजी रात्रीची ड्युटी करून तो सहकाऱ्यांसोबत तिन चाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या (एम.एच.१९ बी.जे. १६९४) क्रमांकाच्या रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी पहूर कडून जामनेरकडे भरधाव वेगाने येत असलेल्या (एम.एच. १९ सीयु ००३७) क्रमांकाच्या कारची आणि रिक्षाची जामनेर ते टाकळी दरम्यानच्या हॉटेल आर्यनगार्डनजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघात दोघ वाहनांचे चालक जखमी झाले तर रविंद्र बावस्कर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कारसह रिक्षातील सहा गंभीर जखमी !
या अपघातात कार चालक सुमित नारायण पाटील (वय ३४, रा. आमखेडा) तर रिक्षातील प्रवासी अनिल मुरलीधर सातव (वय २३), जीवन विकास अहिरे (वय २१), अजय किरण चवरे (वय २०), सुनिल मुरलीधर जाधव (वय ३०), रामेश्वर बाजीराव मोरे (वय २४, सर्व रा. टाकळी, ता. जामनेर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !
अपघातात मयत झालेल्या रविंद्र बावस्कर यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी राजू देवचंद बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चालक सुमित पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहे.