मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अभिनंदन प्रस्तावात विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली. यात शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या गुलाबराव पाटील यांनी “चार लोकांच्या कोंडाळ्यानं आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं”, असं विधान केले होते. तर यानिमित्ताने जाणून घेऊ या गुलाबरावांनी उल्लेख केलेले ‘ते’ चार कोंडाळे कोण? आहेत.
राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत सिद्ध झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी आपल्या अभिनंदनपर भाषणात शिवसेनेतील काही नेत्यांवर उघड टीका केली. यात खासकरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश होता. “चार लोकांच्या कोंडाळ्यानं आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं”, हे गुलाबरावरावांचे विधान खूपच गाजले. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा रोख असलेले ते चार नेते कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गुलाबरावांनी आपल्या संपूर्ण भाषणात दोन जणांनी उघड नावं घेतली. यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचा समावेश होता. पण त्यांनी आमदारांच्या मतांवर निवडून येणाऱ्या खासदारांवर देखील टीका केली होती. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी उल्लेख केलेल्या चार जणांमध्ये संजय राऊत, अनिल देसाई यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्याचप्रकारे गुलाबराव पाटील यांचा इशारा अनिल परब आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडेही होता का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार असूनही मुख्यमंत्र्यांना भेटायचं म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्या याच चार व्यक्तींची आधी परवानगी घ्यावी लागत होती असंही नाराज आमदारांनी बोलून दाखवलं आहे.
तसंच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून मिलिंद नार्वेकर यांना ओळखलं जातं. त्यामुळे गुलाबरावांच्या ‘त्या’ चार जणांच्या लिस्टमध्ये मिलिंद नार्वेकरांच्या समावेश असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, भाषणात अनेकदा आमचे आमदार व्यथा मांडायला जायचे. पण चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होता. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हाती घेऊन इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. चार लोकांच्या कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. ज्यांची लायकी नाही ते आमच्यावर बोलतात आमची मतं घेऊन खासदार होतात. याच डुकरांची मतं घेऊन निवडून येतात. काय शब्द वापरतात, हे कोण सहन करणार?”, अशी खदखद गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती.