ठाणे (वृत्तसंस्था) सर्वत्र ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे त्यांनी ठाणे महापालिकेवर थेट ठिय्या आंदोलन केले आहे.
ठाण्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथे रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथे आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा उडाले आहेत. रुग्णांना ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शन वेळेवर मिळत नाहीये. याच प्रश्नाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड याच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या. त्यांनी ठाणे महापालिकेच्या दालनाखाली ऑक्सिजन आणि रेमडिसिव्हरच्या तुटवड्याबाबत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मनसेचे ठाण्याचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी ऋता आव्हाड यांनी ठाणे महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ठाणे महापालिकेवर आरोग्य व्यवस्थेशी संबंधित अनेक आरोप केले.
यावेळी आंदोलन करताना रुता आव्हाड यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी कोरोना आणि रुग्णांच्या उपचाराबाबत ठाणे मनपा गंभीर दिसत नसल्याचा आरोप केला. तसेच ऋता आव्हाड आणि मनपाचे विरोधी पक्षनेता शानू पठाण यांनी पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिजन फलक आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन घोषणाबाजी केली.