भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांसह एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुरूवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तर सोमवारी नव्याने या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात संशयिताना सोमवारी हजर केल्यानंतर त्यांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तिघांना अटक !
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांसह रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) या युवकांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली होती. हे हत्याकांड शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडले होते. सुरूवातीला भावंडांचा जागीच मृत्यू झाला होता रमेश इंगळे या तरुणाचा गोदावरी रुग्णालयात रविवारी पहाटे दोन वाजता मृत्यू ओढवला होता.
7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली !
या हल्ल्यात विकी साळुंखे (30) हादेखील जखमी झाला आहे. कंडारीतील खून प्रकरणी दीपक छगन तायडे व मनोज श्रावण मोरे व किरण सपकाळे (तिन्ही रा.कंडारी, ता.भुसावळ) या तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर रविवारी नव्याने संशयित देविदास मधकुर पवार (भील), अमोल रवींद्र कोळी व मयूर लिलाधर कानडे (कोळी, सर्व रा.कंडारी) यांना अटक करण्यात आली. संशयिताना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.नितीन खरे यांनी युक्तीवाद केला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हत्याकांडातील आरोपीचे घर पेटवण्याचा प्रयत्न !
कंडारी हत्याकांडातील आरोपी दीपक तायडे याचे घर जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांनी शनिवारी सायंकाळी केला मात्र पेट्रोलची फेकलेली बाटली वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतली तर बाटली फेकणारे संशयीत मात्र कारमधून पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
















