चाळीसगाव (प्रतिनिधी) दिवाळीच्या सुट्टीनंतर बसस्थानकावर वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पुन्हा आपले हातसाफ केले आहेत. कन्नड येथील एका महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजारांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगाव बसस्थानकावर घडली.
कन्नड येथील मीराबाई रमेश सूर्यवंशी (वय ५०) या आपल्या कुटुंबीयांसह सुनेच्या वैद्यकीय तपासणीसाठी चाळीसगाव येथे आल्या होत्या. त्यांनी लहान मुलगा व सुनेला रुग्णालयात पाठवले. तर मोठा मुलगा, सुन व नातू यांची धुळ्याकडून येणाऱ्या बसची त्या वाट पाहत होत्या. मीराबाई व त्यांचे पती हे नातवाला खाऊ देण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकात आले होते. दरम्यान, २६ रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते धुळे बसच्या खिडकीतून नातवाला खाऊ देत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅमची ९० हजारलाची सोन्याची पोत चोरून नेली. या घटनेनंतर मीराबाईंनी कुटुंबासह पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले; मात्र, चोरीचा ठोस पुरावा हाती लागला नाही. दरम्यान, दिवाळीनंतर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याने चोरटे सक्रीय झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
	    	
 
















