ठाणे (वृत्तसंस्था) वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपुर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच राज्यभरात तिच्यावर जवळपास २० पेक्षा जास्त गुन्हे नोंद करण्यात आले होते. या सर्व गुन्ह्यांसदर्भात केतकीने आपल्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता केतकीला एका प्रकरणात जामीन अर्ज मंजूर झाला आहे तर दुसरीकडे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना केंद्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तुरुंगात जावं लागलं होतं. आपल्याला पोलिसांनी केलेली ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत तिने हाय कोर्टात धाव घेतली होती.
याच प्रकरणाची आता केंद्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून या आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना सात दिवसाच्या आत लेखी अहवाल सादर करण्याचे आयोगाचे निर्देश दिले आहे. तसंच याबाबत १७ जून रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान पोलीस महासंचालकांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे महिला आयोगाचे निर्देश दिले आहे.