मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेच्या (Ketaki Chital) अडचणी आणखीच वाढल्या आहेत. आधीच पोलीस कोठडीत असलेल्या केतकीला आता आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीवर गुन्हा दाखल झालेल्या अॅट्रोसिटी प्रकरणाची सुनावणी आज ठाणे सत्र न्यायालयात पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.
दरम्यान, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालं आहे.