मुंबई (वृत्तसंस्था) जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना ईडीने पाठवलेल्या नोटीसीवरून संताप व्यक्त केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी राऊत पुढे म्हणाले की, आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसे यांनीदेखील इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपल्याला पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी नोटीस येणार असल्याचे सांगितले आहे.