जळगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदारसंघ संघात एका गद्दारामुळे आपला उमेदवाराचा पराभव झाला, अशी टीका माजी मंत्री सतीश पाटील यांनी आ. एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केली आहे. दरम्यान आ.खडसे यांनी आधी श्रीराम पाटलांची माफी मागवावी मगच इकडे यावे, असे सांगत त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय पवार साहेबच घेतील असेही ते म्हणाले. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक गुरुवारी पक्ष निरीक्षक भास्कराव काळे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.
माजी मंत्री पाटील म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघातील श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली. ऐनवेळी आमदार एकनाथ खडसे भाजप मध्ये गेले. सुनेला निवडून आणले. आता विधानसभेसाठी परत राष्ट्रवादीत येत आहे. ते भाजपात गेले असे ही म्हणतात, पुन्हा नाही पण म्हणतात, पाप करायचे आणि अल्टीमेट दयायचे असे राजकारण कधी पाहीले नाही. आता पवार साहेबांशिवाय पर्याय नाही, असा टोला त्यांनी खडसेंना लगावला.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा ची ताकद वाढली आहे. यामुळे आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील याची खात्री मला आहे. आपण गावा गावात आपले संघटन मजबूत केले पाहिजे. प्रत्येक बुथवर कार्यकर्ते नेमून प्रत्येक मतदार बाहेर कसे पडेल व तो आपल्या उमेदवारांना मतदान कशी करेल यासाठी ही योजना आपण आखली पाहिजे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाची सध्या चांगलीच लाट असून पक्षात प्रवेश करणाऱ्याची संख्या वाढली आहे. त्याचा फायदा घेऊन पक्ष मजबुत करण्यासाठी बुथनिहाय सर्वे करा असे आवाहन पक्षाचे निरीक्षक भास्करराव काळे यांनी इच्छुक उमेदवारांना केले आहे. मी लवकरच तालुक्या तालुक्यात बैठका घेईन. संघटन कौशल्य संघटनात्मक बांधणी लवकर करेल सोबतच बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचं माझं नियोजन आहे असे सांगत लवकरच जिल्ह्यात घोंगडी बैठका घेऊ असे ही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. बी. एस. पाटील, ग्रामीण विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री नागरे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना पाटील, तिलोत्तमा पाटील, मंगला पाटील, शालीग्राम मालकर, आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.