धरणगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कोरोना काळातील औषधी खरेदीत अपहार झाल्याचे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या वादात आता कॉंग्रेसने उडी घेतली असून खडसेंकडून जिल्ह्यात महाविकास आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा खळबळजनक आरोप धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंदन दिलीपराव पाटील यांनी केला आहे.
कोरोना काळात जिल्हा चिकित्सक यांनी करोडो रुपयांची औषधे खरेदी केली. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली होती. यावेळी त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर सुद्धा काही गंभीर आरोप केले होते.परंतू एकनाथराव खडसे यांना जिल्ह्यात दुसरा कोणताही नेता वाढलेला पाहावत नाही. त्यांच्या मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सुद्धा असेच खोटेनाटे आरोप करण्यात आले होते. खडसे आरोप करून विरोधी नेत्यांना अडकवून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रामाणिकपणे महाविकास आघाडी एकत्र कशी राहील, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना कारण नसताना त्रास देण्याच्या प्रयत्न खडसे यांच्याकडून सुरू आहे. एकनाथराव खडसे यांनी महाविकास आघाडीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कारण नसताना बदनाम करताय. परंतू खडसे यानिमित्ताने हे विसरताय की, त्यांच्या आरोपाने पालकमंत्री नव्हे तर, महाविकास आघाडी बदनाम होत आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची बदनामी करून नये, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मत असल्याचेही चंदन पाटील यांनी म्हटले आहे.