चोपडा( प्रतिनिधी)—
वेळोदे(ता चोपडा) येथील खंडेराव महाराज यांच्या यात्रेला सात डिसेंबर पासून सुरुवात होत असून आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत यात्रेच्या दिवशी पालखी मिरवणूक होऊन वांगेसटच्या व्रताची सांगता होईल. खानदेशात प्रसिद्ध असलेल्या यात्रांपैकी एक असलेल्या वेळोदे येथील खंडेराव महाराज यात्रेची परिसरात मोठी उत्सुकता असते. गेल्या 86 वर्षापासून या यात्रेची परंपरा राहिली असून येत्या सात डिसेंबर पासून ही यात्रा भरविण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार मोतीराम बोरसे यांना 1902 मध्ये स्वप्नात येऊन खंडेराव महाराजांनी दृष्टांत दिल्याचे सांगितले जाते. त्यावरून या गावात खंडेराव महाराज आणि बानोई (बानू) मातेच्या मूर्तीची स्थापना त्यावेळी करण्यात आली. पुढे 1938 मध्ये त्यांचे वंशज सुकलाल बोरसे व वनाजी बोरसे यांनी नवीन मूर्ती आणून तिची गावाबाहेर आताच्या जागी असलेल्या बस स्टँड चौकात स्थापना केली. आणि तेव्हापासून नवे मंदिर रूपात आले. या मंदिर परिसरातच गेली 86 वर्षे ही यात्रा भरवली जाते. खानदेशातील प्रसिद्ध यात्रांपैकी एक असलेल्या या यात्रेत मोठ्या प्रमाणावर भांडीकुंडी आणि संसार उपयोगी वस्तूंची विक्री केली जाते. वेळोदे व परिसरातील सासरी गेलेल्या महिला यावेळी यात्रेसाठी खास करून माहेरी येतात. यात्रेत नवस फेडणाऱ्यांची मोठी गर्दी होते. बाहेरगावी नोकरीला असलेले अनेक जण खास सुट्टी घेऊन आपल्या मूळ गावी परततात. आणि यात्रेचा आनंद घेतात.
साधारणपणे एक आठवडाभर ही यात्रा चालते.महाराष्ट्रातील सर्व नामवंत तमासगिरांनी या यात्रेत कधी न कधी हजेरी लावून आपले वगनाट्य सादर केले आहे.
जुना इतिहास पाहता गतकाळात या यात्रेत महाराष्ट्रातील सर्व नामवंत तमासगिर येऊन त्यांनी आपले खेळ केलेले आहेत. या यात्रेला आठवडाभरात सुमारे पाऊण लाख भाविक हजेरी लावतात. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीला ही यात्रा भरवली जाते. मुळात वेळोदे गावा हे पुढील वीस बावीस गावांचे प्रवेशद्वार असल्यामुळे या सर्व गावांचा दररोजचा येण्या जाण्याचा व्यवहार या गावाशी जोडलेला आहे. एका बाजूला धुळे जिल्हा एका बाजूला जळगाव जिल्हा असलेल्या आणि लगतच्या मध्य प्रदेशातील पहाडपट्टीतील काही भाविक या यात्रेत सहभागी होतात………वांगेसट ची प्रथा……..चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी खंडेराव महाराजांची तळी भरून उठवली जाते. त्यावेळी मंदिरात पूजा आरतीसाठी गावकरी एकत्र जमतात.पूजाविधी झाल्यानंतर त्याच ठिकाणी गुळाचा प्रसाद वाटप केला जातो. ही परंपरा गेली 85 वर्षे अखंडपणे सुरू आहे. त्यानंतर भजनी मंडळाच्या निनादात गावभर खंडेराव महाराजांच्या प्रतिमा असलेल्या पालखीची मिरवणूक काढली जाते .यावेळी सर्व भाविक आणि गावकरी या मिरवणुकीत सहभागी होतात. विशेषतः येथील बोरसे परिवार खंडेराव महाराज यांना दैवत मानत आलेला आहे .या परिवारातील अनेक जण आषाढी एकादशी ते नागपंचमीपर्यंत वांगेसट व्रत पाळतात .त्या कालावधीत वांगे खात नाहीत.आणि यात्रेच्या दिवशी या व्रताची सांगता होते……… सद्यस्थितीत खंडेराव महाराजांचे मंदिर अत्यंत सुंदर व नवीन रंगरंगोटी करून बनवण्यात आले असून मंदिरात खंडेराव महाराज व त्यांची पत्नी म्हाळसा घोड्यावर बसल्याची आकर्षक मूर्ती आहे. त्याच्या पुढे दैत्य असून या मूळ मंदिराच्या बाजूलाच लहानसे मंदिर असून ते बानुई (बानू) मातेचे आहे .गेले अनेक वर्षे भरणाऱ्या या यात्रेची परिसरातील भाविकांना कायमच उत्सुकता असते. या मंदिरात सध्या सुरेश बोरसे पुजारी म्हणून काम पाहतात…….
.वेळोदे(ता चोपडा) खंडेराव महाराज व बानोई मातेचे मंदिर