जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम 2025 अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसाठी विविध कृषी उत्पादने, खते, बी-बियाणे आणि प्रचार साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले. या स्टॉल्सचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, पारोळ्याचे आमदार अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिलकुमार दोहरे आणि सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक रमेश जेठानी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्टॉल्समध्ये उन्नत बी-बियाणे, जैविक व रासायनिक खते, कीड व रोग नियंत्रण साहित्य, आधुनिक कृषी यंत्रे व तंत्रज्ञान तसेच माहितीपत्रके व मार्गदर्शक पुस्तिकांचा समावेश होता.
शेतकरी बांधवांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती, विविध अनुदानित योजनांचे मार्गदर्शन, तसेच कृषी उत्पादन व संवर्धनासाठी आवश्यक साधनांची माहिती या उपक्रमांतून मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.