जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मे महिन्यांच्या सुरुवातीस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे खरीप पूर्व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने दिलेल्या उघडीपनंतर शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना गती दिली आहे. दरम्यान, पूर्व हंगामी कपाशी लागवडीसह काही शेतकऱ्यांनी चारा साठवणुकीची योग्य सोय करून घेतली आहे.
सिंचनाची सोय असलेल्या भागात सध्या पूर्वहंगामी लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली असून, इतर ठिकाणी शेतकरी वेगाने पेरणीसाठी शेती तयार करत आहेत. यामुळे कृषी दुकानांमध्ये बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. कापसाला गेल्या दोन वर्षांपासून उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षीत दर मिळाला नाही. त्यामुळे नगदी पिक समजले जाणारी कपाशी शेती तोट्यात गेल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे कपाशी बियाण्याची कृत्रिम टंचाई यंदा दिसून येत नाही. मागणी असणारे बियाणे सहज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना लागवडीसाठी अडचणींचा सामना करावा लागत नाही.
कपाशी बियाणे ‘लिंकिंग ‘मुक्त
गेल्या पाच-सहा वर्षांपासून काही आघाडीच्या कंपन्यांचे उच्च उत्पादकतेचे कपाशी बियाणे शेतकऱ्यांना बुकिंगच्या स्वरूपात किंवा अधिक दराने खरेदी करावे लागत होते. मात्र यंदा या पद्धतीला मोठा अपवाद ठरला असून, कपाशी बियाण्याचा बाजार यंदा ‘लिंकिंग’ मुक्त झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. घटलेला कपाशीचा पेरा तसेच अनधिकृत एचटीबीटीला शेतकऱ्यांनी दिलेली पसंती यामुळे बीटी बियाण्याची मागणी लक्षणीय घट झाल्याचे चित्र आहे.
खतांचा पुरेशा साठा
बहुतांश कृषी विक्रेत्यांनी खताचा पुरेसा साठा करून ठेवल्यामुळे बाजारात सर्व प्रकारची खते सध्या उपलब्ध आहेत. आगामी काळात टंचाईची शक्यता लक्षात घेता काही शेतकरी आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार खरीप हंगामासाठी आवश्यक खते खरेदी करत आहेत.