जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि चकीत करणारी बातमी समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली. पण, महाराष्ट्र पोलिसांनी त्वरित कारवाई करत, उमर्टी गावात पोहोचून आपल्या कर्मचाऱ्याची सुखरुप सुटका केली आणि एक मोठे संकट टाळले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली, पण त्याचवेळी काही लोक पोलिसांवर धावून आले आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्याला मध्य प्रदेशातील उमर्टी गावात नेले. आरोपीला सोडण्याची मागणी करत, अपहरण करणाऱ्यांनी धमकी दिली की, “आरोपीला सोडणार नाही तोपर्यंत पोलिसाला सोडणार नाही.”
अन् पोलीस कर्मचाऱ्याची केली सुटका
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी तातडीने उमर्टी गावकडे रवाना झाले. त्यांनी मध्य प्रदेश पोलीस आणि प्रशासनाशी त्वरित संपर्क साधला. अखेरीस, पोलिसांनी उमर्टी गावातून अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि आरोपींच्या तावडीतून त्याची सुटका केली.
मध्य प्रदेशातील उमर्टी गावात पोलिसांची धाडसी कारवाई
उमर्टी गावात पोलीस दलाने धाडसी कारवाई केली. खुद्द पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी अपहरण झालेल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी मध्य प्रदेशात पोहोचले. अखेरीस, महाराष्ट्र पोलिसांनी रात्री उशिरा चोपड्यात दाखल होऊन आपल्या अपहरण केलेल्या कर्मचाऱ्याला सुखरूप परत आणले.