सातारा (वृत्तसंस्था) पुण्यात राहणाऱ्या अल्पवयीन नातीनेच आपल्याच आजीच्या घरातील सोन्यावर डल्ला मारल्याची घटना मौजे कासवंड ( ता. महाबळेश्वर) येथे घडली होती. पोलीस तपासात अल्पवयीन नातीनेच आजीच्या घरात डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.
मौजे कासवंड ( ता. महाबळेश्वर ) येथे ३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये राहत असलेले वयोवृद्ध दांपत्य शेतामध्ये काम करत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहत्या घराचे कुलूपबंद दरवाजा चावीने उघडून घरातील पत्र्याचे पेटीमध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाची चैन व तीन तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र व चांदीच्या पट्ट्या, तसेच कानातील फुले, असा ऐवज चोरी केला होता. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची चोरी ही कोणीतरी माहितीच्या माणसाने लक्ष ठेवून केलेली असावी, असे एकमत झाल्याने पोलिसांनी तपासाची दिशा फिर्यादी यांचे कुटुंबातील नातेवाईक यांच्याकडे वळवली. गोखलेनगर, हडपसर, पुणे येथे घरफोडी करून चोरीस गेलेले दागिने विक्री झाले असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तपास करत असताना घर फोडीतील सोन्याचे दागिने हे फिर्यादी यांची विधीसंघर्षग्रस्त नात हिने चैनीचे वस्तू खरेदी करण्याकरिता पुणे येथून कासवंड येथे येऊन चोरी केल्याचे समोर आले.
चोरीचे दागिने तिचा विधीसंघर्षग्रस्त मित्र व त्याच्या आईच्या ओळखीने व मदतीने गोखलेनगर येथील एका सोनारास विकून त्यातून आलेल्या पैशातून महागडे कंपनीचा मोबाइल व एक स्कुटी मोटारसायकल बुक केल्याचे तपासात उघड झाले. विधीसंघर्ष बालिका तसेच आरोपी महिलेला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घर फोडी करून चोरून नेलेले सहा तोळे वजनाचे सोन्याचे चैन व मणीमंगळसूत्र व कर्णफुले तसेच चांदीच्या पट्ट्या असा सुमारे १ लाख ८६ हजार रुपयांचा चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचगणी पोलिसांनी सदरचा गुन्हा हा कसलीही माहिती नसताना कौशल्यपूर्ण तपास करून उघडकीस आणला आहे.