यवतमाळ (वृत्तसंस्था) व्यावसायिक भागीदारीतील पैशांच्या वादातून एका तरुणाचा खून करून मृतदेह जंगलात फेकल्याची खळबळजनक उघडकीस आली आहे. शेख सलमान शेख बिस्मिल्ला (२५, रा. अनसिंग, जि. वाशिम) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मृतकाचा भाऊ शेख अरबाज शेख मनवर (२०, रा. अनसिंग) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृतक व अमजद पठाण हे दोघे अनेक वर्षांपासून भुसार व्यवसाय भागीदारीत काम करीत होते. दोघांमध्ये आर्थिक वाटाघाटीवरून दोनवेळा वाद झाले व ते वाद कुटुंबीयांनी मिटविले होते. त्यानंतर पुन्हा दोघेही व्यवसाय करीत होते. १२ ऑक्टोबर रोजी पुन्हा तसाच वाद मृतक सलमान व अमजद यांच्यात झाला. त्यावेळी त्यांच्या गोडाउनमध्ये मृतकाचा व्यावसायिक भागीदार अमजदचा पुतण्या आरोपी उबेर पठाण अजीस पठाण (२१, रा. अनसिंग) आला होता. त्याने मृतक सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली व निघून गेला. १३ ऑक्टोबर रोजी मृतक सलमान नेहमीप्रमाणे सकाळी घरून निघाला होता. भुसार गोडाउनवर गेल्यानंतर सकाळी १० वाजेपासून त्याचा मोबाइल बंद येत होता. त्यामुळे नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सलमानचा मृतदेह अनसिंगपासून जवळच असलेल्या पुसद तालुक्यातील उड़दी (लाखी) घाटामध्ये आढळून आला. पोलीस तपासात दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास भुसार गोडाउनमध्येच मृतक सलमानची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह बारदाण्यात गुंडाळून घाटात फेकून विल्हेवाट लावण्यात आल्याचे उघड झाले. धक्कादायक म्हणजे ज्या चारचाकी वाहनातून मृतदेह आणण्यात आला, त्या वाहनाच्या चालकास आरोपी उबेरने घटनेची वाच्यता केली तर मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तो भयभीत होता. परंतू त्याने हिंमत करत ही बाब मालकाला सांगितली व खुनाचे बिंग फुटले. उबेर पठाण अजीस पठाण व त्याच्या इतर साथीदारांनी खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून संशयित आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना नांदेड व अकोला परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
















