जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कालिंका माता चौक परिसरातील हॉटेलमध्ये बुधवारी ८ ते १० जणांच्या टोळीने किशोर सोनवणे याच्यावर सशस्त्र हल्ला करून निर्घृण खून केला होता. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप लावले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला.
हॉटेलमध्ये केला हल्ला !
शहरातील प्रबोधन कॉलनीतील किशोर सोनवणे याचा कालंका माता मंदिर चौकात चायनिजची गाडी लावणाऱ्या रुपेश काकडे याच्यासोबत पैशांवरुन बुधवारी सायंकाळी वाद झाला, त्यानंतर किशोर हा त्याचे मित्र अमोल सोनार, गणेश घ्यार, अमोल कोल्हे, सुनिल नावांदेकर, राजू कुशवाह, जयसिंग राजपुत, प्रशांत वाणी यांच्यासोबत रात्री आठ वाजता कालंका माता मंदिराजवळील हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेले. येथे जेवण करतांना किशोरला फोन आला आणि तो फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर पडला. त्यानंतर त्याचे पुन्हा चायनिज विक्रेता रुपेश काकडे याच्यासोबत वाद झाला. त्याच्या मित्रांनी त्याठिकाणी धाव घेत त्यांचा वाद मिटवून किशोरला पुन्हा जेवणासाठी हॉटेलमध्ये आणले. त्यानंतर किशोर मित्रांसोबत जेवण करीत असतांना चायनिज विक्रेता रुपेश काकडे याने काही तरुणांना फोन करुन बोलावून घेतले, दरम्यान, दुचाकीवरुन आलेले सुमारे दहा ते पंधरा जणांचा टोळके हातात लाकडी दांडुके आणि चॉपरसारखे धारदार शस्त्र घेवून हॉटेलमध्ये शिरले. त्यानंतर टोळक्याने किशोर सोनवणे याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
जिल्हा रुग्णालयात तणाव !
आंदोलन मागे घेतल्यानंतर मयत किशोरच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश करण्यात आला. रास्तारोको केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांवर गंभीर आरोप !
किशोर सोनवणेच्या मारेकऱ्यांना शनिपेठ पोलीस ठाण्यातील शनिपेठ ठाण्याचे राहुल पाटील आणि सुधीर साळुंखे हे दोन पोलिस कर्मचारी हे पाठीशी घालत आहे. पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी देखील मयताच्या नातेवाईकांनी पोलीस उपअधीक्षक गावित यांच्याकडे केली होती. या आरोपांचे पोलीस उपअधिक्षकांनी खंडन केले.
चार जणांना अटक तर मुख्य संशयित फरार !
टोळक्याच्या हल्ल्यात किशोर सोनवणेचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडीलांनी मध्यरात्री शनिपेठ पोलिसात तक्रार र दिली. त्यानुसार रुपेश मनोहर सोनार (रा. श्रीराम कॉलनी असोदार रोड), निलेश युवराज सपकाळे (रा. मोहन टॉकीज समोर), आकाश युवराज सपकाळे (रा. मोहन टॉकीज समोर), अमोल छगन सोनवणे (रा. श्रीराम कॉलनी), मयुर विनोद कोही (रा. असोदा रोड), दुर्लभ कोळी (रा. सुनसगाव, ता. जळगाव), ईश्वर सुभाष काकडे, रुपेश सुभाष काकडे (दोघ रा. असोदा रोड) यांच्यासह अन्य दोन तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी रुपेश सुभाष काकडे (वय २७), ईश्वर सुभाष काकडे (वय २३). प्रशांत सुभाष काकडे (वय ३०, तिघ रा. असोदा रोड) या भावंडांसह मयुर विनोद कोळी (वय २१, रा. असोदा रोड) या चौघांच्या मुसक्या आवळल्या, तर मुख्य संशयित मात्र अद्याप फरारच आहेत.
डीवायएसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे !
किशोर सोनवणेच्या नातेवाईकानी जो पर्यंत मारेकऱ्यांना अटक होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेब या गुन्ह्याचा तपास शनिपेठ पोलिसांकडे न देता तो एलसीबीकडे द्यावा अशी मागणी लावून धरत जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडत रास्तारोको केला. पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी मयताच्या नातेवाईकांच्या मागण्या मान्य करीत तात्काळएलसीबीचे प्रभारी पोलीस निरीक्षकांना रुग्णालयात बोलावून घेत या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे वर्ग केला. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले.















