मुंबई (वृत्तसंस्था) लैंगिक छळ प्रकरणाच्या एका घटनेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. चुंबन घेणं आणि प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे यावर न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. ओठांचे चुंबन घेणे आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणे हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला.
मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३७७ नुसार (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि मुलाच्या जबाबानुसार, आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याने त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला. आपल्या मते सकृद्दर्शनी आरोपीचे हे कृत्य अनैसर्गिक लैंगिक गुन्हा होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवले.
मुलाचा वैद्यकीय अहवाल वगळता या प्रकरणी कलम ३७७ लावण्यासाठीचा आणखी पुरावा काय आहे, अशी विचारणा न्यायालयाने आरोपीच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांना केली होती. शिवाय मुलाच्या वैद्यकीय अहवालातूनही अनैसर्गिक लैंगिक गुन्हा झाल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे आरोपीवर ‘पोक्सो’अंतर्गत जी कलमे लावण्यात आली आहेत, त्यात तो दोषी ठरल्यास पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आहे. गेले वर्षभर आरोपी कारागृहात असून त्याच्यावर अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही आणि नजीकच्या काळात खटला सुरू होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत आरोपी जामिनास पात्र असल्याचे न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी आदेशात नमूद केले.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, कपाटात ठेवलेले पैसै कमी असल्याचे मुलाच्या पालकांना आढळले. त्यामुळे त्यांनी मुलाकडे त्याबाबत विचारणा केली असता तो ऑनलाइन गेम खेळत असल्याचे आणि आरोपीच्या दुकानात या ऑनलाइन गेमचे रिचार्ज करण्यासाठी खर्च केल्याचे त्याने सांगितले. त्याच वेळी असाच एकदा तो ऑनलाइन गेम रिचार्जसाठी गेला असताना आरोपीने ओठांचे चुंबन घेतल्याचे आणि गुप्तांगाला स्पर्श केल्याचेही मुलाने पालकांना सांगितले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.