वरणगाव (प्रतिनिधी) प्रेम विवाहाचा राग मनात ठेवून तीन जणांवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तळवेल येथे एका विवाह सोहळ्यात घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन जखमींना उपचारार्थ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रेम विवाहासंदर्भात तळवेल गावातील दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, काल रात्री लग्न समारंभात हा वाद पुन्हा उफाळला आणि संशयित आरोपींनी चाकूने हल्ला करून या प्रकरणातील फिर्यादी निखिल प्रदीप पाटील, प्रसाद पाटील व तुषार भारंबे यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, स्थानिकांनी तातडीने हस्तक्षेप करून जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आलेत. तर घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
या प्रकरणामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तळवेल येथील शेतकरी निखील पाटील (वय २८) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन तळवेल येथील संशयित आरोपी गणेश किशोर भारंबे, किशोर हरी भारंबे, स्वाती किशोर भारंबे यांच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रमोद कंखरे करत आहेत. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर लग्न समारंभामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर वऱ्हाडी मंडळींना नेमका काय प्रकार घडत आहेत, हेच कळले नाही. परंतु, त्यामुळे महिलांसह लहान मुलेही धास्तावले होते.
प्रेम विवाहाच्या कारणावरून घडली घटना
या चाकूहल्याची घटना ही प्रेमविवाहाच्या कारणातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चार महिण्यांपूर्वी निखिलचा मित्र अश्विन विकास पाटील याने गावातील मुलीसोबत प्रेम विवाह केला होता. ही मुलगी भारंबे कुटुंबातील होती. तेव्हापासूनच या वादाची ठिणगी पडली होती. याच कारणावरुन २ मार्चला तळवेल येथील तुकाराम नगरमध्ये विवाहाच्या वेळी पूर्व वैमनस्यातून पुन्हा वाद निर्माण झाला व चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्ला हा गणेश किशोर भारंबे याने मागील भांडणाचे कारणावरून त्याचे वडील किशोर हरी भारंबे यांच्या सांगण्यावरून झाल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले आहे. प्रसाद विकास पाटील, तुषार संजय भारंबे यांना चाकूने मारून जखमी केले तसेच स्वाती किशोर भारंबे हिने निखिल या शिवीगाळ करून खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी ही दिली आहे.