पुणे (वृत्तसंस्था) क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावींवर आहे.
के पी गोसावी याच्या विरोधात चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने फसवणुकीची तक्रार पुणे पोलिसात दिली होती. त्याने नोकरीच्या आमिषाने चिन्मयकडून पैसे उकळले होते, असा आरोप चिन्मयकडून करण्यात आला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात गोसावीचं पंच म्हणून नाव समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात फसवणुकीचा आरोप करणारे काही विद्यार्थी समोर आले होते. तेव्हापासून के पी गोसावी फरार होता. आर्यन खान प्रकरणात के पी गोसावीचा बॉडीगार्ड अशी ओळख सांगणाऱ्या प्रभाकर साईलने एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत त्याने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडविण्यासाठी कथित २५ कोटीचं डील झाल्याचा दावा केला होता. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर फरार असलेला गोसावी सोशल मीडिया आणि पत्रकारांशी फोनवर चर्चा करत समोर आला होता. त्याने प्रभाकरच्या सर्व आरोपांचे खंडन केलं होतं. तसेच आपण पोलिसांकडे सरेंडर होत असल्याचं सांगितलं होतं. पण वास्तव्यात तो सरेंडर झालाच नाही. अखेर पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला कात्रजमधील एका लाँजवरून बेड्या ठोकल्या.
















