धरणगाव (प्रतिनिधी) आज क्रांतिसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त गावातील काही होतकरू तरुणांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून तात्यासाहेबांना अनोख्या पध्दतीने आदरांजली अर्पण केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे याचा प्रत्यय अवकाळी पाऊस, दुष्काळ, पाणी टंचाई यांसारख्या गोष्टींमधून मानवाला येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखता येवून त्याचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी महात्मा फुले यांच्या स्मृतिदिननिमित्त वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प धरणगाव शहरातील गोपाल चौधरी, निलेश महाजन, कमलेश महाजन या तरुणांनी केलेला आहे.
शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत धरणगाव नगरपरिषद शहरात लोकसहभागाच्या सहकार्याने वृक्ष लागवड करणे, शहरातील हरित क्षेत्र वाढविणे साठीचे उपक्रम, पर्यावरण पूरक वाहनांचा वापर यासारखे उपक्रम राबावित असून त्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद मार्फत करण्यात आलेले आहे. त्या अहवानाला प्रतिसाद देत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी शहरातील या तरुणांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे.