लखीमपूर (वृत्तसंस्था) लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता. विशेष तपास पथकाने ही माहिती दिली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाच्या प्रमुखांनी न्यायाधीशांना याबाबत चिट्ठी लिहिली आहे. यात आशीष मिश्राविरोधातील आरोप दुरुस्त केले पाहिजे असं म्हटलं आहे. या प्रकरणी आशीष मिश्रा आणि त्याचे इतर सहकारी हत्या आणि कटाच्या आरोपांचा सामना करत आहेत. यात हत्येचा प्रयत्न आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली आहे.
विरोधी पक्षांनी या घटनेनंतर सातत्याने अजय मिश्रा यांना पदावरून हटवण्याची मागणी केलीय. मात्र, आतापर्यंत मोदी सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. मात्र, तपासात समोर येत असलेल्या नव्या पुराव्यांमुळे भाजपावरील दबाव वाढण्याची चिन्हं आहेत. लखीमपूर हत्याकांडानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना सातत्याने दिसून आली आहे. त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे.