चाळीसगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाला आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.
यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कालच गावाजवळच्या माळरानावरील जमीनीची साफ-सफाई करण्यात आली होती. आज सकाळपासूनच पिंपळगावात लोकांनी रांगोळ्यांनी रस्ते सुशोभीत करून आपल्या सुपुत्राला निरोप देण्याची तयारी केली. ठिकठिकाणी फलकांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आज सकाळी नाशिक येथून यश देशमुख यांचे पार्थिव घरी आले तेव्हा कुटुंबियांचा आक्रोश पाहून वातावरण भावविवश झाले. सजवलेल्या वाहनावरून त्यांचे पार्थिव नेण्यात आले. तेव्हा जोरदार घोषणांनी वातावरण भारावून निघाले. त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापती पोपट भोळे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, लष्करी व पोलीस जवान तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















