जळगाव (प्रतिनिधी) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षाबंदी असलेले कै. शरद इंदल परदेशी यांचे मयताबाबत आक्षेप असल्यास २० जुलै, २०२१ पावेतो उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय, एकात्मता चौक, कॉलेज रोड, नवीन तहसिल कार्यालय, मालेगांव, जि. नाशिक यांना लेखी स्वरुपात खुलासा कळविण्यात यावा. सदर तारखेपर्यंत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. असे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंदी क्रं.सी. १११६५ कै. शरद इंदल परदेशी यांस बाल लैगिंक अत्याचार संरक्षण कायदा, २०१२ च्या कलम ५ (१), ०६, ४२ भादंवि, १८६० कलम ३७६ (२), प्रमाणे अपराधांसाठी स्पे.के.नं. ५०/२०१३ मध्ये दि. २० मार्च, २०१७ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ व विशेष न्यायाधीश-१ (पोक्सो) जळगाव, जि. जळगाव यांनी १० वर्षांची शिक्षा सुनावलेली होती. दि. २६ मार्च, २०१७ पासुन सदर बंदी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झाला होता.
सदर बंदी करागृहातील स्वयंपाकगृह विभागात हाड्यांचे (डाळ बनविण्याचे) काम करीत असतांना दि. ३ जुलै, २०१८ रोजी हंडा उचलण्याचे क्रेनमध्ये अचानक विद्युतप्रवाह झाल्याने बंद्यास शॉक लागल्याने स्वयंपाकगृह विभागातील कर्मचारी यांनी बंद्यास इतर बंद्यांच्या सहाय्याने कारागृह रुग्णालयात नेले असता कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी दि. ३ जुलै, २०१८ रोजी दुपारी १४.२५ वाजता मयत घोषित केले. फौजदारी प्रकिया संहिता, १९७३ मधील कलम १७६ (१) (२) (३) (४) अन्वये कै. शरद इंदल परदेशी यांचे मृत्युबाबतची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी उपविभागीय दंडाधिकारी, मालेगांव यांना दिले आहेत.
तरी कै. शरद इंदल परेदशी यांच्या मयताबाबत आक्षेप असल्यास २० जुलै, २०२१ पर्यंत लेखी स्वरुपात कळविण्यात यावा. असे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे.