कोल्हापूर (वृत्तसंस्था) गडहिंगलज येथील उद्योजक संतोष शिंदे यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून १ कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणाऱ्या एका माजी नगरसेविकेसह सपोनि राहुलकुमार श्रीधर राऊत (वय ३५, सध्या नेमणूक, पोलिस कंट्रोलरूम, अमरावती, मूळगाव निलजी, ता. गडहिंग्लज) या दोघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांनी ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली. तर दुसरीकडे अन्य संशयित विशाल बाणेदार व संकेत पाटे (रा. पुणे) यांचा पोलिस कसून शोध घेत आहे.
बलात्काराचा खोटं गुन्हा दाखल झाल्यानंतर तणावातून आत्महत्या !
दोन महिन्यांपूर्वी संतोष शिंदे यांच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिंदे यांना एक महिना तुरुंगवास सहन करावा लागला होता. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यापासून ते तणावात होते. तसेच आर्थिक विवंचना आणि मानसिक ताणतणावाखाली त्यांनी शुक्रवारी (दि. २३) रात्री ११ ते शनिवार (दि. २४) पहाटे ५ या दरम्यान आपल्या पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी रात्री संतोष शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी, मुलगा अर्जुनसह विष पिऊन व गळे चिरून घेऊन आत्महत्या केली.
दोघांनी काढला पळ !
घटनेची माहिती मिळताच ‘ती’ माजी नगरसेविका व सपोनि राऊत हे दोघेही गडहिंग्लजमधून पळून गेले होते. पोलिसांनी रविवारी विजापूर येथील हॉटेलातून शिताफीने ताब्यात घेतले. सोमवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात ‘त्या’ नगरसेविकेसह राऊतला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचे गडहिंगलज येथील वकील संघटनेने घेतल्यामुळे आरोपींनी बाहेरून वकील बोलावले होते. या वकिलांना देखील रोखण्याच प्रयत्न झाला. परंतू पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी कोर्टात आरोपींची बाजू मांडली.
न्यायालय परिसरात जोरदार घोषणाबाजी !
आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी आणल्याचे समजताच शहरातील विविध पक्ष- संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात जमले होते. आरोपींनी बाहेरचे वकील आणल्याचे समजताच जनसमुदायाने जोरदार घोषणाबाजी करून संतप्त भावना व्यक्त केल्या. तर दुसरीकडे आपण काही केले नसल्याप्रमाणे आरोपींचे चेहरे निर्विकार होते. दरम्यान, त्या नगरसेविकेसह सपोनि राऊत याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच राऊत याला सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी देखील नागरिकांनी केली.
दोघांना पाच दिवसांची कोठडी !
पुण्यातील दोन संशयित व आरोपी यांच्यात संगनमत आहे का? त्यांच्याकडील शिंदे यांचे साडेसहा कोटी येणी, हनी ट्रॅप, आरोपींच्या मोबाइलमधील माहिती व बँकेच्या व्यवहारातील तपशील आदी बाबींच्या तपास आणि समाजातील रोष लक्षात घेता दोघांनाही अधिकाधिक पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारतर्फे नीता चव्हाण यांनी केली. तथापि, शिंदे यांनी पत्नी व मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्यामुळे आरोपींना कमीत कमी पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. परंतु, त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. . या युक्तिवादानंतर न्या. राठोड यांनी पाच दिवसांची कोठडी सुनावली.