जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पदावरुन हटविल्यानंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश रात्री उशिरा काढले आहेत.
मराठा समाजाविषयी बकालेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. गणेशोत्सव काळातील ही क्लीप आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठविला होता. तसेच बकालेंना तडकाफडकी पदावरून बाजूला सारत नियंत्रण कक्षात जमा केले होते. बुधवारी दुपारी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन काळ्या फिती लावून बकाले यांच्याविरोधात घोषणबाजी केली. यात पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणही चव्हाट्यावर आलेले आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर बकाले रजेवर गेले आहेत.
पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नेमणूकीस असलेल्या एका पोलीस अंमलदारासोबत विशिष्ट समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्ट, घृणास्पद निदणीय व विशिष्ट समाजाच्या भावना भडकवणारे संभाषण केल्याची मोबाईलवरील संभाषणाची ऑडीओ क्लीप व्हायरल झालेली आहे. बकाले यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर कार्यरत असतांना. उच्च नैतिक मुल्ये बाळगुन, लोकांप्रती सौजन्य आणि सहवर्तन ठेवणे अपेक्षीत होते. असे असतांनाही विशिष्ट समाजाबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर केला आहे. व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपमधील संभाषणामुळे विशिष्ट समाजात चुकीचा संदेश जावून, पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असून, बकाले यांच्या या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणाच्या गैरवर्तन आहे.
खातेनिहाय चौकशीला सुरुवात
बकालेंविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरुपाच्या प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली असून, सदरचे प्राथमिक चौकशीत बाधा आणू नये, फेरफार करु नये, ती पारदर्शकरित्या व्हावी. साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा प्रलोभन दाखवू नये सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीचे अनुषंगाने बकाले यांना “शासकीय सेवेतून निलंबित” करण्याचे आदेशात म्हटले आहे.
लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडून न जाण्याचे आदेश !
निलंबन काळात बकाले यांचे पोलीस मुख्यालय हे नाशिक ग्रामीण राहणार आहे. तसेच त्यांना पोलीस उप अधीक्षक (मुख्या), नाशिक ग्रामीण यांच्याकडे दररोज नियमित हजेरी देण्यासह कोणत्याही परिस्थीतीत पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जावू नये. सदर आदेशाचे पालन केले नाही तर विनापरवाना मुख्यालय सोडले असे मानण्यात येवून वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, अशा सक्त सूचना बकाले यांना देण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे याचं शांततेचं आवाहन !
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रात्री एक व्हिडीओ समाजमाध्यमात प्रसारित करत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. श्री. मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार जळगाव विभागीय पोलीस अधिकारी हे बकालेंविरुद्ध खातेअंर्तगतही चौकशी करणार असल्याची माहिती दिली. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी पोलीस दल घालणार नाही. त्यामुळे समाज बांधवांनी शांततेसह जिल्ह्यातील कायदा-सुव्यस्था राखावी, असेही आवाहन श्री. मुंढे यांनी व्हिडीओद्वारे केले आहे.