नांदेड (वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आघाडी येत्या 15 दिवसांत निर्णय घेईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.
माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव आणि सहकारसूर्य या गोदावरी अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय उद्घाटननिमित्त पवार नांदेड येथे आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र किंवा स्वतंत्र लढण्याविषयी सहकारी पक्षांसोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील. 15 दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.
“कोण केतकी? नेमकं काय प्रकरण आहे हे मला ठाऊक नाही. संबंधित व्यक्तीही मला माहिती नाही. तुम्ही सांगता तेही माहिती नाही. त्यांनी काय केलं. तक्रार काय होती. नेमकं काय केलं ते कळाल्याशिवाय बोलता येत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. “दोन-तीन दिवस माझ्याबद्दलची एक तक्रार वाचण्यात आली. एका कवीच्या काव्याचा मी भाषणात उल्लेख केला होता. त्यावर काही लोकांनी वेगळं मत मांडलं पण ते वास्तव नव्हतं”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.
















