धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बालकवी ठोंबरे शाळेत ‘एकाग्रतेसाठी योग’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी जळगाव मधील योगाचार्य कृणाल महाजन प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे उत्तम चरित्र घडविणारा हा कार्यक्रम जळगाव आरोग्य भारती आणि जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ परिवार, स्वस्थ ग्राम आणि स्वस्थ राष्ट्र हे ध्येय घेऊन आरोग्य भारतीच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात तर जनकल्याण समितीच्या वतीने समाजाच्या उन्नतीसाठी वैद्यकीय, शैक्षणिक, आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवून समाजाप्रती आपले ऋण व्यक्त करीत असतात. या दोन्ही राष्ट्र हिताला समर्पित संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
कार्यक्रम प्रसंगी बालकवी ठोंबरे विद्यालयातील इयत्ता ९ वी चे २५० विद्यार्थी उपस्थित होते. तर व्यासपीठावर जनकल्याण समितीचे कार्यकारणी सदस्य ललितजी उपासनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सेवा प्रमुख डॉ. चेतन भावसार, आरोग्य भारतीचे देवगिरी प्रांत सहसचिव डॉ. पुष्कर महाजन, शाळेचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ स्वयंसेवक विनय कापुरे, सोमनाथ महाजन आणि शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.