मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं संजय राऊत म्हणाले.
अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. ज्या दिल्लीत राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार हाकतात. त्या ठिकाणी सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन विना रुग्णांचा प्राण जातो. कोरोनामुळे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात आरोग्य विषयक अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता हा नरक नाही तर काय आहे? असा सवाल त्यांनी केला.