अहमदनगर (वृत्तसंस्था) अण्णा हजारे यांनी मागील आंदोलन स्थगित करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलन करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. शिवाय नव्या कृषी कायद्यांसंबंधी पत्रात काहीही भाष्य केलेले नाही. ‘हे आंदोलन केव्हा, कसे व कोठे केले जाईल, याचा तपशील लवकरच जाहीर करू,’ असे पत्र हजारे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविले आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबरला भारत बंद पाळण्यात आला होता. त्यामध्ये हजारे यांनी सक्रिय सहभाग घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. पूर्वी आपल्याला सरकारने दिलेल्या आश्वसनांचे पुढे काहीच झाले नाही, असे सांगत वेळ पडल्यास आपण पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यावशीच हजारे यांनी दिला होता. त्यानंतर आज हजारे यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पूर्वीच्या आंदोलनात केलेल्या मागण्या आणि त्यावर सरकारने दिलेली आश्वासने यांचाच उल्लेख केला आहे. त्यामुळे हजारे यांचे आंदोलन झालेच तर ते दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांपेक्षा वेगळ्या मुद्द्यांवर असणार आहे. कृषिमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, ५ फेब्रुवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धी येथे तत्कालीन कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन अन्य मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिले होते. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून कृषी मालाचा उत्पादन खर्च व किमती ठरविणे अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती.
नव्या कृषी कायद्यांसंबधी हजारे यांनी कोणताही उल्लेख केला नाही अगर विरोध किंवा पाठिंब्याची भूमिकाही जाहीर केलेली नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आहे.