धरणगाव (प्रतिनिधी) गावठी कट्ट्यासारख्या दिसणाऱ्या लायटरसोबत फेसबुकवर फिल्मी स्टाईल फोटो टाकणाऱ्या तरुणाला धरणगाव पोलिसांनी सक्त ताकीद देत त्याच्याकडील लायटर जप्त केलेय. गोपनीय शाखेतील विनोद संदानशिव यांनी याबाबतची सतर्कता दाखवली. दरम्यान, जळगाव आणि नशिराबाद येथील गोळीबाराच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने गावठी पिस्तुलांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन बनविला आहे. त्यानुसार सगळीकडे सतर्कता बाळगली जात आहे.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथिल खून तसेच त्यापाठोपाठ जळगावात झालेल्या गोळीबाराच्या घटना या पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी. शेखर नुकतेच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यांवर आले होते. दोन्ही घटनास्थळांवर भेट देवून आढावा घेतल्यानतंर पोलिस अधिक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गावठी पिस्तुलांची तस्करी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन बनविला असल्याची माहिती डॉ. शेखर यांनी दिली होती. अवैध गावठी पिस्तुलांसारखी शस्त्रे, अवैध सावकारी व महिला अत्याचार यातील गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचा मानसही व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा पोलीस दल गावठी कट्ट्यांबाबत अधिकची सतर्क आहे.
याच पार्श्वभूमीवर धरणगावातील एका तरुणाने गावठी कट्ट्यासारख्या दिसणाऱ्या वस्तूसोबत फेसबुकवर फिल्मी स्टाईल फोटो टाकला होता. ही गोष्ट गोपनीय शाखेतील विनोद संदानशिव यांनी लागलीच संबंधित तरुणाला बोलवले. तसेच फोटोमध्ये गावठी कट्ट्यासारखी वस्तू दिसत असल्याबाबत विचारणा केली. त्यावर तरुणाने ते लायटर असल्याचे सांगितले. संदानशिव यांनी लागलीच ते लायटर ताब्यात घेतले. यानंतर अशा पद्धतीचे फोटो सोशल मीडियात टाकू नये, अशी समज संबंधित तरुणाला सपोनि गणेश अहिरे, गोपिनीयचे विनोद संदानशिव आणि मिलिंद सोनार यांनी दिली.