शिरपूर (प्रतिनिधी) दारूच्या पैशाच्या उधारीवरून चौघांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. राजू सुदाम कोळी (वय ३२, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शहरातील वाल्मीक नगरातील रहिवासी सुदाम कोळी यांचा मुलगा राजू कोळी याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. राजूच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. त्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी साशंकता निर्माण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे कळतेय. शहरातील वाल्मीक नगर भागात राजू कोळी राहतो. त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना २३ एप्रिलला दुपारी घडली होती. राजू सुदाम कोळी हा चार भाऊ आणि आईसह राहतो. त्याला २३ एप्रिलला दुपारी लहान भाऊ गणेश उठवण्यासाठी गेला. पण राजू उठला नाही. गणेशने परिसरातील नागरिकांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी येत खात्री केली असता राजूचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
ही घटना घडण्यापूर्वी राजुचे भाऊ पानसेमल येथे गेले होते. गणेशने माहिती दिल्यावर सर्वजण तातडीने घरी परतले. त्यांनी राजूचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेला. पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचा पंचनामा केला. राजूच्या मानेवर, कानावर व पाठीवर मारहाणीच्या खुणा आढळल्या. रक्ताचे डागही दिसून आले. त्यामुळे त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे लक्षात येत होते. अधिक तपास केल्यानंतर सत्य समोर आले.
मृत तरुणाचा भाऊ राकेश सुदाम कोळी (वय २३, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दारूच्या उधारीच्या पैशांमुळे तीन दिवसांपूर्वी राजूचे भांडण झाले होते. चौघांनी शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी राजूला मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास राजू हा दारू पिण्यासाठी किस्मतनगर येथे गेला असता सुंदरवाडी रोडवर चौघांनी अडविले. त्यानंतर पुन्हा शिवीगाळ करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात राजूच्या डोक्याला, पाठीला, पोटाला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली.
मारहाण होत असल्याचे लक्षात येताच त्याला त्याच्या भावांनी सोडविले. त्यानंतर राजू याला गंभीर अवस्थेत घरी आणले. यावेळी त्याच्या कानातून रक्त येत होत होते. तर डोळाही सुजला होता. जखमी राजूला घरातच झाेपविण्यात आले. सायंकाळी तो झोपेतून उठत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी राजूला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सोमवारी दुपारी ४ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.