नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एखाद्या गोष्टीची तस्करी करण्यासाठी तस्कर कोणत्या थराला जातील, त्याचा नेम नाही. प्रसंगी जिवावर बेतेल असली भीषण कृत्यंही ते करतात. असाच प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी एका तस्कराला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून ५२ जिवंत साप आणि ४३ शिंग असलेले सरडे सापडले आहेत. त्याने तस्करीसाठी जी पद्धत वापरली ते पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
ही चकित करणारी घटना कॅलिफोर्नियामध्ये घडली. एक ट्रक ड्रायव्हर मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेरेषेवर असलेल्या सैन य्सिद्रो या ठिकाणी जात होता. दरम्यान सीमा सुरक्षा विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं. त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे काही दुर्मीळ साप आणि सरडे सापडले. त्याने या प्राण्यांची पिल्लं पिशव्यांमध्ये बांधून आपल्या गुप्तांगावर लपवली होती.
या पिशव्यांमध्ये ५२ जिवंत साप आणि ४३ शिंग असलेले सरडे होते. या सरड्यांच्या जाती दुर्मीळ मानल्या जातात. या सरड्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अन् इतक्या दुर्मीळ प्राण्यांची तो तस्करी करत होता. दरम्यान या व्यक्तीला पोलिसांनी पकडलं असून त्याची चौकशी सुरु आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती लोक आहेत? अन् अमेरिकेतील कुठल्या भागांत हे रॅकेट पसरलं आहे? याचा तपास केला जात आहे.