वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये वाहनाने धडक दिल्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. वॉशिंग्टन कॉम्प्लेक्स येथे वाहनाने सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिअरला धडक दिली आणि आतमध्ये घुसले. या घटनेनंतर कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
चालकाने वाहनातून बाहेर येत पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचं पोलीस प्रमुखांनी सांगितलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान या २५ वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली असून हल्ल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. “हा हल्ला दहशतवादाशी संबंधित असल्याचं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही, मात्र आम्ही नक्कीच तपास करणार आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.