मुंबई (वृत्तसंस्था) बाबरी मस्जिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. पण आता भाजप पैसे मागण्यासाठी रस्त्यावर आली असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. राम मंदिर निधी संकलनाच्या भाजपच्या कार्यक्रमाबाबत बोलताना ‘देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची पॉवरफुल बैठक झाली.
राम मंदिर निर्माणासाठी देशभरात भाजपकडून निधी संकलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण पैसै मागण्यासाठी. आपल्याला तसं करायचं नाही. राज्यातील तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे बडे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच बडी बैठक होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. बाबरी मस्जिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. पण आता भाजप पैसे मागण्यासाठी रस्त्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावलाय.
शिवसेनेनाही राज्यभरात ‘शिवसंपर्क’ अभियान राबवणार आहे. तशी माहिती शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार आहे.