पुणे (वृत्तसंस्था) पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेली ही कारवाई केंद्र सरकारच्या पत्रानंतरच झाल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राणे कुटुंबीयांना लुकआऊट नोटीस जारी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, राणे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र केंद्र सरकारच्या गृह विभागानंच राज्य शासनास पाठवलं होतं. या प्रकरणाची सत्यता पडताळणी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.
डीएचएफएल कर्ज प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. नितेश राणे व नीलम राणे यांनी ६५ कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याची तक्रार पोलिसांकडं आली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीनं ही तक्रार दिली आहे. पंचवीस कोटींचे कर्ज घेतलेल्या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपनीच्या नीलम राणे या सह अर्जदार होत्या.
आर्टलाईनकडून कर्जाची परतफेड करण्यात आली नसल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तसेच नीलम हॉटोल्स प्रा. लि. या कंपनीने ४० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याचीही ३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पुणे पोलिसांनी तीन सप्टेंबर रोजी लुकआऊट नोटीस बजावल्याचे समजते. न्यायालायच्या आदेशानुसार ही नोटीस काढण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.