भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुनसगाव येथे विटांचे ट्रॅक्टर आल्याचे खोटे सांगून एका दाम्पत्याकडून ५० हजार रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी घडली. विशेष म्हणजे ही फसवणूक भर वस्तीतील मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या करण्यात आली असून संबंधित अज्ञात भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
सुनसगाव येथील सुपडू बोराळे (वय ४५, मजुरी) व पल्लवी बोराळे (वय ४०, अंगणवाडी सेविका) हे आपल्या कुटुंबासह गावातील मुख्य रस्त्यालगत वास्तव्यास आहेत. दुपारी सुमारे २ वाजता एक अनोळखी इसम मोटारसायकलवर त्यांच्या घराजवळ आला. ‘विटांचे ट्रॅक्टर आले असून रस्ता दाखवा,’ असे सांगून त्याने सुपडू बोराळे यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांना गोंभी फाटा येथील केळी वेफर्सच्या दुकानाजवळ नेऊन बसवले व ‘घरातून विटांचे पैसे घेऊन येतो,’ असे सांगत मोटारसायकलसह पसार झाला.
दरम्यान, तोच इसम थेट बोराळे यांच्या घरी गेला. त्या वेळी पल्लवी बोराळे भाजीपाला निवडत असताना त्याने विटांचे पैसे देण्याची मागणी केली. पल्लवी बोराळे यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून सीआयएफचे ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम कपाटात ठेवलेली होती. सुरुवातीला त्यांनी १० हजार रुपये देऊ लागल्यावर त्या इसमाने मोबाईलवर बोलण्याचे नाटक करत “१० नाही, ५० हजार द्या,” असे सांगितले. विश्वास ठेवून
पल्लवी बोराळे यांनी ५० हजार रुपये दिले आणि तो इसम तात्काळ निघून गेला. काही वेळानंतर सुपडू बोराळे घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी संबंधित इसमास आपण ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. परिसरातील शेजारच्या कृषी केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भामटा कैद झाला असून, नंबर प्लेट नसलेल्या होंडा शाईन मोटारसायकलवर तो आल्याचे दिसून येत आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोराळे दाम्पत्याने संध्याकाळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों धिरज मंडलिक तपास करीत असून, परिसरातील व मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित भामट्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.














