जळगाव (सुरेश उज्जैनवाल) लक्ष्मणराव गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा (लकी टेलर) जळगाव शहर व तालुक्यातील एक चर्चित चेहरा टेलर ते उद्योजक असा या व्यक्तीचा जीवन प्रवास. त्यांनी स्वतः च्या बळावर साधलेली प्रगती थक्क करणारी आहे. आपल्या कल्पक बुद्धी व परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नातून त्यांनी स्वतः चे विश्व शून्यातून निर्माण केले आहे. केवळ उद्योजकचं नव्हे तर एक निर्भीड अन बिनधास्त राजकारणी म्हणून आपले व्यक्तिमत्व सिद्ध केलं आहे .ही व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी की, कुठले मोठे राजकीय पद भूषविलेले नाही पण आव्हानात्मक भूमिकेसाठी तत्पर असतात. अश्या या अवलिया व्यक्तीचा आज वाढदिवस वयाची 59 वर्षे पूर्ण करून ते 60 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांचे या निमित्त अभिष्टचिंतन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा..!
जळगाव तालुक्यातील खापर खेडा या अगदीच लहान खेड्यात जन्मलेले लकी अण्णा
कोणतीही आर्थिक अथवा राजकीय पार्श्वभूमी नसताना वयाच्या 19 व्या वर्षी जळगाव शहरात येऊन टेलरिंग व्यवसायापासून सुरवात केली.शहरातील श्यामा प्रसाद उद्याना जवळील बी.आर. टेलर यांच्या कडे टेलर म्हणून काम सुरू केले, कपडे शिवण्याच्या कलेने अल्पावधीत त्याचा जम बसला व लक्ष्मण चे लकी टेलर म्हणून नावा रुपाला आले, बारावी पर्यंत शिक्षण प्राप्त लकी अण्णा फार काळ या व्यवसायात रमले नाही,
1985 मध्ये त्यांनी टेलरींग व्यवसाय सोडून जळगाव मार्केट यार्ड येथे मापाडी ते धान्य खरेदी, विक्रीसह आडात क्षेत्रात उतरले. सन 2002मध्ये शासनाने कापूस एकाधिकार योजना मागे घेतली, त्यामुळे त्यांनी कापूस खरेदी व्यवसाया कडे आपला मोर्चा वळविला आणि कॉटन मर्चंट म्हणून आपले अस्तित्व सिद्ध केलं. आज लक्ष्मी जिनिंग प्रेसिंग सह त्याच्या एकूण 5 फॅक्टरीज कार्यरत आहेत, कापसाच्या किंवा जिनिंग च्या माध्यमातून हंगामात पाच शे ते सातशे जणांना रोजगार देतात. टेलर ते उद्योजक हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्याच्या यशस्वीतेचा आलेख विलक्षण प्रेरक आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकता
जळगाव तालुक्यातील सार्वजनिक क्षेत्रातील एक चर्चित चेहरा किंवा व्यक्तिमत्व म्हणता येईल. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बारा वर्षे ते संचालक राहिले आहेत, नुकत्याच मुदत संपलेल्या जळगाव बाजार समितीत त्यांनी दिड वर्ष सभापती पद भूषवित आपल्या अल्प कालीन कार्याचा प्रभावी ठसा उमटविला आहे, त्यांनी बाजार समितीचे मानधन ही कधी ही घेतले नाही की एक रुपयाचे व्हावचर सुध्दा त्यांचे नावे नाही, उलट आपल्या पारदर्शक कार्य पध्दतीच्या माध्यमातून त्यांनी समितीला कर रूपाने मिळणारे 2 लाख 30 रुपयांपर्यंत स्थिरावलेले उत्पन्न 14 लाखांपर्यंत नेत एक नवीन इतिहास निर्माण केला. लिकेज बंद केले, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देत पाच वर्षांपासून थकलेल्या भविष्य निर्वाह निधी सह सर्व थकीत देयके अदा केली. मार्केट यार्ड मधील व्यापारी, दुकानदार याचे 29 वर्षांचे करार करून दिले.भाजी पाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर.ओ. प्लांट बसविले, भुई काटा बसविला, पूर्ण मार्केट मध्ये पेव्हर ब्लॉक बसविले, विद्युत रोषणाई अद्ययावत केली आणि ही कामगिरी अवघ्या दीड वर्षाच्या अल्प काळात करून दाखविली. जळगाव बाजार समितीत स्वतः च्या बळावर 5 संचालक निवडून आणून आपल्या राजकीय क्षमतेची जाणीव राजकारण्यांना करून दिली. त्यांनी तीन वेळा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली मात्र अत्यल्प मतांनी त्यांचा पराभव झाला. ते कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नाही, पण कुणाशी ही मतभेद अथवा वैर नाही. खापर खेडा या त्यांच्या गावाचं राजकारण व सार्वजनिक व्यवस्था विलक्षण कौतुकास्पद आहे. शब्दाला जागणारा आणि टाकलेली किंवा घेतलेली जबाबदारी पूर्ण निष्ठे सह ताकदीने पार पाडण्याची धमक त्यांच्या मध्ये असल्याचे दिसून येते.त्याचं एक ब्रीद वाक्य आहे ” सार्वजनिक अथवा राजकीय नेतृत्व करणारा कुणाचा ही मिंधा नसावा. कारण असं नेतृत्व समाजाला न्याय देऊ शकत नाही.”
सुरेश उज्जैनवाल (8888889014)