जळगाव (प्रतिनिधी) गिरीश महाजन यांनी आता विरोधी पक्ष असल्याचे काम करावे, तसेच आंदोलन व मोर्चाचा सराव करावा, त्यामुळे कार्यकर्ते रिचार्ज होत असतात. निदान यामुळे तरी ते विरोधी पक्ष म्हणून काम करतील, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना लगावला. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.
वानखेडे हे बॉलीवुडमधील कलाकारांवर चुकीची कारवाई व त्यांच्यावर धाक निर्माण करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप मंत्री मलिक यांनी केला होता. यावर पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, आपण या प्रकरणाच्या जास्त खोलात गेलो नाही. मात्र, यावर मलिक तसेच, राज्यातील इतर मंत्री हे वक्तव्य करीत आहेत, त्यातून एनसीबी करीत असलेल्या कारवाईची खरी वस्तुस्थिती समोर आली आहे. यावर आता राज्यातील तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील व त्यानुसार आगामी काळात मंत्रिमंडळ काम करेल, असे पाटील म्हणाले.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी १ नोव्हेंबरला जळगाव येथे शेतकरी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलतांना मंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार आहे, याबाबत शासनाने अध्यादेश काढला आहे. दिवाळीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांची वीज कापू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे महाजनांचा मोर्चा कशासाठी आहे हा प्रश्नच आहे. मात्र, महाजन यांनी आता विरोधी पक्ष असल्याचे काम करावे व आंदोलन व मोर्चाचा सराव करावा, त्यामुळे कार्यकर्ते रिचार्ज होत असतात. निदान यामुळे तरी ते विरोधी पक्ष म्हणून काम करतील, असा टोमणा त्यांनी महाजनांना लगावला आहे.