मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी या बंदला ढोंगीपणाचा कळस असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसंच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे.
फडणवीस म्हणाले की, हे तेच सरकार आहे ज्यांनी पाण्यासाठी मावळला शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. बंद जबरदस्तीने केला जातोय, हे बंद म्हणजे पोळी भाजण्याचं काम करत आहेत. दमदाटी करून, प्रशासनाचा वापर, धमकी देऊन बंद केला आहे. सरकार पुरस्कृत हा बंद आहे. कारण ईस्टर्न फ्री वे वर दहा कार्यकर्ते उपस्थित होते आणि पोलीस तमाशा पाहात होते, असं फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने आज राज्यभर बंद पुकारला आहे. हा पुकारलेला बंद ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करत, आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करतानाच मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजाराच्या घोषणा केल्या, ५० हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं. हे सरकार मदत करत नाही त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले.