मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राबाहेरील बाजारबुणग्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची भाषा करू नये. हिंमत असेल, तर महाराष्ट्रात लढून दाखवावे, असे थेट आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे माजी सरचिटणीस दिनेश परदेशी यांच्यासह मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत हाताला शिवबंधन बांधून शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला.
विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीवर भर दिला आहे. शाह यांनी मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यांत मार्गदर्शन केले. ‘येत्या निवडणुकीत पहिले टार्गेट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष असल्या’ चे त्यांनी तेथे जाहीर केले. त्याला ठाकरे यांनी बुधवारी उत्तर दिले.
‘गेल्या आठवड्यात परदेशी भेटून गेले होते. आता ते भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आले आहेत. त्यामुळे मला भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्यात सुरू झालेला भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? हिंदुत्वाच्या नावावर भाजपच्या लोकांनी थोतांड माजवले आहे. माझे हिंदुत्व वेगळे आहे,’ असे सांगून ठाकरे यांनी शाह यांचा समाचार घेतला. त्यांचे भाषण मी ऐकले नाही, परंतु या बाजारबुणग्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा आहे. त्यांना कल्पना नाही, हा वीरांचा महाराष्ट्र आहे.
‘बाजारबुणगे’ हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आहे. या बाहेरील बाजारबुणग्यांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करू नये. त्यांच्यात हिंमत असेल, तर महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढवून आम्हाला संपवून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र बाजारबुणग्यांना पुरून उरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.