जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विद्यापीठातील फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, बुद्धिस्ट अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ११ ते १४ एप्रिल कार्यक्रम आयोजित केले आहे.
सोमवार ११ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी राहतील. “महात्मा फुले यांच्या विचारकार्याचा विविध समाज समूहांवरील प्रभाव” या विषयावर इतिहासकार श्रीमंत कोकाटे, पुणे यांचे व्याख्यान होईल. प्रा. म.सु. पगारे लिखित ग्रंथाचे प्रकाशन होईल. मंगळवार १२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता “आंबेडकरवादी चळवळीचे इतर विविध आयाम आणि आव्हाने” या विषयावर आनंदराज आंबेडकर यांचे व्याख्यान होईल. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची उपस्थिती राहील. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे अध्यक्षस्थानी राहतील.
बुधवार १३ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिर तर दुपारी २.३० वाजता शाहिरी जलसा हा कार्यक्रम शाहीर धूरंधर, मुक्ताईनगर हे सादर करतील. गुरुवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ७.१५ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीस प्रारंभ होऊन ९.३० वाजता समारोप होईल. १०.३० वाजता “पुरोगामी चळवळीच्या दृष्टिकोनातून विकसनशील भारत” या विषयावर डॉ. अशोक राणा यांचे व्याख्यान होईल.