जळगाव (प्रतिनिधी) भाजपाशासित उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये जळगावच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केले आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत शुक्रवारी दि. ०८ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतर्फे तिन्ही पक्ष प्रमुखांतर्फे देण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे आ. शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, महानगराध्यक्ष शरद तायडे, प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना बेपर्वापणे चारचाकी वाहनाखाली चिरडण्याची घटना घडली आहे. या घटनेत केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह अन्य दोषी संशयितांना उत्तर प्रदेशातील भाजपशासित सरकार वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांवरील अन्याय वाढले आहेत. नागरिक त्यांच्या कारभारावर नाराज आहेत. लखीमपूर खिरी घटनेचा निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बंदची हाक दिली आहे.
यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना आदी संघटना, पक्ष सहभागी होणार आहे. या बंद मधून आपत्कालीन व जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहे.
शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात सामान्य नागरिकांवर अत्याचार वाढत चालले आहे. लखीमपुर खीरी घटनेमध्ये भाजपच्या नेत्यांची हुकूमशाही स्पष्टपणे दिसून आली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा या प्रकरणात दोषी दिसून येत असतानाही अद्यापही फरार आहे. त्याला अटक करण्यामध्ये एवढा विलंब का लागत आहे असा सवालही विष्णू भंगाळे यांनी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविंद्र पाटील म्हणाले की, उत्तर भारतातील शेतकरी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी व दहशत पसरविण्यासाठी भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद उपाय करीत आहे. त्याचाच प्रकार म्हणजे त्यांना कारखाली चिरडण्याचा प्रकार घडला आहे. काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी सहभागी व्हावे. शेतकरी देशाचा पोशिंदा आहे. त्याच्या सन्मानासाठी महाराष्ट्र बंद मध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. बंद शांततेत पार पाडला जाईल, असेही पवार म्हणाले.
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक लाडवंजारी, योगेश देसले, काँग्रेसचे राज्य पदाधिकारी विनोद कोळपकर, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख, जिल्हा पदाधिकारी डी.जी.पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.