एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारात गांजाची शेती एरंडोल पोलिसांनी उधळून लावली आहे. पोलिसांनी तब्बल ६१ लाख २५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तुर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड करून संगोपन होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी छापा टाकून दोन्ही शेतातून ६१ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ८७५ किलो गांजा तसेच ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली. दरम्यान, सदरचे शेत मालक गुजरात येथील रहिवासी असून त्यांनी सदरचे शेत हे जुपने कसण्यासाठी इसम नामे मेरसिंह खरटे गाठीया खरटे (रा. ढेढगा फाल्य मुलवानीया कबरी, खरगोन राज्य मध्यप्रदेश) यास दिले असल्याची माहीती स्थानीक रहीवासीकडुन प्राप्त झाली आहे. आरोपीत इसमाने पोलीसांची कुणकुण लागताच पोबारा केल्याची प्राथमीक माहीती प्राप्त झाली असुन, सदर बाबत पोहेका विलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, मागील वर्षी गांजाच्या कारवाईमुळेचा एरंडोल तालुका बदनाम झाला होता. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन, पूढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे करीत आहेत.