चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे ८५ हजार ६५३ अशा ‘रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाले आहेत. या मतदार संघातून एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने याआधी कोणताही आमदार निवडून आला नसल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघे १६ हजाराचे मताधिक्क्य होते. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मंगेश चव्हाण हे अवघ्या ४ हजार २८७ मतांनी विजयी झाले होते.
मंगेश चव्हाण यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८६हजार ५१५ एवढी मते मिळाली होती. तर २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा लीड ८५ हजार ६५३ एवढा आहे. यावेळी त्यांना एकूण १ लाख ५७ हजार १०१ मते मिळाली आहेत. मंगेश चव्हाण यांनी गतवेळी जेवढी मते मिळवली, त्याचा जवळपासचा त्यांनी यंदा लीड मिळवला आहे.
चाळीसगाव मतदारसंघात झालेली विकासकामे आणि निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहिणी’चा मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे मंगेश चव्हाण यांचा दणदणीत विजय झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आ. मंगेश चव्हाण यांच्या कामांची तोंडभरुन केलेली प्रशंसा आणि सूचकरित्या मंत्रीपदाचा दिलेला शब्द चाळीसगावकरांमध्ये सकारात्मक संदेश देणारी ठरली.