मनमाड (वृत्तसंस्था) जुन्या भांडणाची कुरापत काढून एका टोळक्याने मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन पगारे यांच्या मुलाचा खून केल्याची घटना शनिवारी (दि. ३) रात्री उशिरा घडली. शुभम देवीदास पगारे (वय २७) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, तसेच मयताचे नातेवाईक आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शहरातील महात्मा बसवेश्वर चौकाच्या पुढील बाजूस असलेल्या पडिक जागेवर ही घटना घडली. रात्री सर्व मित्र मंडळी एकत्र जमलेले असताना त्यांच्यात मागील भांडणावरून वाद झाले. वाद विकोपाला गेल्याने निशांत सुळके, कृष्णा थोरात, मोहित उर्फ ओम पगारे व एक अनोळखी व्यक्तीने शुभमवर धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यात शुभम हा जखमी झाल्याने त्यास येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु तेथूनही नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, धारदार शस्त्राने शरीरावर खोलवर घाव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांनी घटनास्थळी पाहणी केली, तसेच फॉरेन्सिक पथक बोलावून तपासणी करण्यात आली. दरम्यान, ही वार्ता शहरात पसरताच पोलीस ठाण्याबाहेर गर्दी जमली.
संतप्त जमावाने मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणून मारेकऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह न हलविण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप जमावाने पोलिसांवर केला. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला. सुमारे साडेतीन तासाच्या नंतर सहा वाजता पोलिसांनी शेखर पगारे यांच्या फिर्यादीवरून निशांत सुळके, कृष्णा थोरात, मोहित उर्फ ओम पगारे व एक अनोळखी अशा व्यक्तींवर हत्येसह अॅट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले, तसेच संशयितांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, आश्वासन अपर पोलीस अधीक्षक भारती यांनी आश्वासन दिल्यानंतर शुभमच्या नातेवाईकांनी मृतदेह डॉ. आंबेडकर चौक येथे हलविला. तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.