मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. गृहमंत्र्यावर याप्रकरणी आरोप झाले होते. या प्रकरणाचा तपास पुढे राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने हाती घेतला होता. त्यानंतर एनआयएने धडक कारवाई चालू केली होती. एनआयएने मुख्य आरोपी सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर आता एनआयएने पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बेड्या ठोकल्या.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सुनील माने यांना बेड्या ठोकल्या. माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट ११ चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे.
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, अशी माहिती समोर आली आहे.