छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) खेळण्यासाठी मोकळ्या मैदानात गेलेल्या सख्ख्या बहीण भावाचा खड्ड्चात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बजाजनगर येथे शुक्रवारी (दि. १५) दुपारी साडेतीन वाजता घडली. चैताली राहुल देशमुख (११), समर्थ राहुल देशमुख (७, दोघे रा. बजाजनगर आर. एम. ११९) अशी मृत बहीण-भावाची नावे आहेत.
विद्या राहूल देशमुख (३५, रा. बजाजनगर आर. एम. ११९) या तानाजी सरडे यांच्या घरी रूम करून मुलगी चैताली व समर्थ यांच्यासह वास्तव्यास होत्या. चैताली चौथीत तर समर्थ इयत्ता दुसरीत बजाजनगरातील स्वामी विवेकानंद शाळेत शिक्षण घेत होते. आई विद्या या कंपनीत काम करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास चैताली, समर्थ ही भावंडे खेळण्यासाठी बजाजनगरातील भूखंड क्र. पी. ३७ मधील सिलोव्हा प्रार्थना स्थळाजवळ गेले होते. येथील मोकळ्या भूखंडात मुरूम उत्खनन केल्याने मोठा खड्डा पडला असून यात ड्रेनेज व पावसाचे पाणी साचलेले आहे.
या परिसरात खेळताना अचानकपणे दोघे बहिण, २ भाऊ खड्यात पडल्याने लगतच खेळत असलेला राजवीर विकास साबरने आरडाओरड केली. मात्र त्याला वेळेत मदत न मिळल्याने तो लगतच्या मैदानावर न्यू, सह्याद्री करिअर अँकडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे विशाल मोरे, गणेश खांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत जीव धोक्यात घालून पाण्यात बुडालेल्या चैताली व समर्थ यांना पाण्यातून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने दोघांनाही बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी विद्या देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कंत्राटदार अशोक शिनगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघं मुलांचा मृतदेह बघताच पालकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.